फ्रान्समध्ये मेयोत इथे चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिंदी महासागरातल्या मादागास्कर आणि मोझांबिक बेटांच्या किनाऱ्या दरम्यान मायोत हा द्वीपसमूह आहे. या चक्रीवादळामुळे किती नुकसान झालं आहे, याचा निश्चित आकडा अद्याप कळू शकलेला नाही. सध्या संबंधित भागात बचावकार्य सुरू आहे. या चक्रीवादळाचा फटका मोझांबिकला देखील बसला असून यात आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
चिडो चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. अशा कठीण प्रसंगात आपल्या प्रार्थना पीडितांसोबत असल्याचंही ते समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाकाली देश या संकटावर मात करेल, असा विश्वासही मोदी यांनी आपल्या संदेशात व्यक्त केला. अशा कठीण प्रसंगात भारत फ्रान्ससोबत असून त्याला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं मोदी आपल्या संदेशात म्हणाले.