भोपाळ वायूगळती दुर्घटनेतल्या यूनियन कार्बाइड कारखान्यातला ३७७ टन घातक कचरा काढण्याचं काम सुरु झालं आहे. हा कचरा बारा सीलबंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला जात आहे. २ आणि ३ डिसेंबर १९८४च्या मध्यरात्री युनियन कार्बाइड कीटकनाशक कारखान्यातून अत्यंत विषारी मिथाइल आयसोसायनेट वायूची गळती झाली. या घटनेत सुमारे पाच हजार ४७९ लोकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक गंभीर आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत.
या घटनेच्या चाळीस वर्षांनंतर, काल या कारखान्यातला घातक कचरा काढण्याचं काम सुरु झालं. हा कचरा बारा सीलबंद डब्यांमधून धार जिल्ह्यातल्या पिथमपूर औद्योगिक परिसरात नेला जात असून काल रात्री कचरा घेऊन जाणारे १२ ट्रक रवाना झाले आहेत. हा कचरा नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. युनियन कार्बाइडचा हा रासायनिक कचरा पिथमपूरच्या रामकी एन्व्हायरो कंपनीत जाळण्यात येणार आहे. भट्टीतून निघणारा धूर चार-स्तरीय फिल्टरद्वारे बाहेर पडेल जेणेकरुन आजूबाजूचा परिसर प्रदूषित होणार नाही. उच्च न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत हा विषारी कचरा काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. सरकारला उद्या ३ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात यासंदर्भात अहवाल सादर करायचा आहे.