महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं आज पहाटे बेंगळुरू इथे त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरू इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती खालावली आणि आज पहाटे त्यांचं निधन झालं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृष्णा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कृष्णा यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जनसेवेला प्राधान्य दिलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे सामान्यांच्या मनात स्थान मिळवलं, असं राष्ट्रपतींनी शोक संदेशात म्हटलं आहे. एस. एम. कृष्णा हे एक थोर विचारवंत होते. पायाभूत सुविधांच्या विकासाला त्यांनी आपल्या कारकिर्दीत प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अन्य नेत्यांनीही कृष्णा यांना आदरांजली वाहिली आहे.
एस. एम. कृष्णा यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदं भूषवली. १९९९ ते २००४ या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर २००४ ते २००८ या काळात त्यांनी महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं होतं. २००९ ते २०१२ पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणूनही कार्यरत होते. तसंच त्यांनी उपमुख्यमंत्री आणि सभापती म्हणूनही काम केलं.