राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जमुक्ती योजना जाहीर करुन निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. दररोज सरासरी ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना द्यायची १० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची भरपाई प्रलंबित आहे, असंही ते म्हणाले.
मध्यप्रदेशाच्या धर्तीवर राज्यातही मुलींसाठी आर्थिक मदत देण्याची योजना राबवण्याचा सरकारचा विचार आहे. पण केवळ मुलींना नव्हे तर मुलांनाही मदत द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. विधानसभा निवडणुकींसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करायला त्यांनी नकार दिला. आधी महायुतीनं लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी कोणाची हे जाहीर करावं असं आव्हान त्यांनी दिलं.
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाची प्रत्येकी १ जागा निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.