डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बदलापूर लैंगिक अत्याचार तपास प्रकरणी एसआयटीची स्थापना

ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधल्या आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांची देखील तत्काळ बदली करण्यात आली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अशा प्रकरणात प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.

 

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून, यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एसआयटी गठित करण्याचे फडणवीस यांनी आदेश दिले. ते म्हणाले आम्ही तात्काळ सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंह, ज्या आय जी लेवलच्या अधिकारी आहेत, त्यांना नियुक्त केलेलं आहे. महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी, अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जी काही कार्यवाही तातडीने केली पाहिजे, ती कार्यवाही देखील केली जाते आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल.

 

काल या घटनेनंतर संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला, त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही आंदोलन केलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा