गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठित केल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज दिली. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातले किल्ले आणि गडावर अतिक्रमण होत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं होतं.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, मुख्याधिकारी, वनक्षेत्र असेल तिथे उप वनसंरक्षक, भारतीय पुरातत्व भारत सरकार, यांचा समावेश असेल.
या समितीने ३१ जानेवारीपर्यंत गडकिल्ल्यांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्या ठिकाणांची यादी सादर करावी, १ फेब्रुवारी ते ३१ मे पर्यंत ही अतिक्रमणं हटवण्यात यावीत, याचा अहवाल शासनाला सादर करावा, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्यावी, या समितीची दरमाह बैठक घेऊन मासिक अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.