इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ऑक्टोबर महिन्यात भांडवली बाजारातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी या महिन्यात ५८ हजार ७११ कोटी रुपयांच्या समभागातून गुंतवणूक काढून घेतली. चीनमधल्या भांडवली बाजारांमधे चांगलं वातावरण राहिल्याचाही परिणाम भारतीय भांडवली बाजारांवर झाल्याचं दिसतं.
गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ५७ हजार ७२४ कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी केली होती. जानेवारी, एप्रिल आणि मे महिना वगळता परदेशी गुंतवणूकदार संस्था या वर्षांत सातत्याने खरेदीदार राहिल्या आहेत. मात्र, आता भू-राजकीय घडामोडी आणि भविष्यातील व्याजदर हे घटक भारतीय भांडवली बाजारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे.