बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया नवीन नसून ही सामान्य प्रक्रिया आहे, आपले नागरिक इतर देशात बेकायदेशीररित्या राहत असतील तर त्यांना परत आणणं हे आंतरराष्ट्रीय कायद्यामधे सामान्यपणे स्वीकारलेलं तत्व आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितलं. अमेरिकेने भारतीय नागरिकांची मायदेशी रवानगी केल्याप्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जयशंकर यांनी आज राज्यसभेत आणि लोकसभेत निवेदन दिलं. मायदेशी पाठवण्यात येणाऱ्या लोकांना चुकीची वागणूक दिली जाणार नाही यासाठी अमेरिकी प्रशासनाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं.
कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देणं आणि बेकायदेशीर स्थलांतराला विरोध करणं हे सार्वजनिक हिताचं आहे, असंही जयशंकर म्हणाले. २००९ मध्ये इतर देशातून ७३४ भारतीयांना माघारी पाठवण्यात आलं. गेल्यावर्षी ३६८ जणांनी मायदेशी रवानगी झाली होती, असंही ते म्हणाले. अमेरिकेने भारतीय नागरिकांना ज्याप्रकारे मायदेशी पाठवलं त्यामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत, असं द्रमुकचे खासदार तिरुची सिवा म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं निवेदन हे देशाच्या नागरिकांच्या बाजूचं नसून अमेरिकेच्या नागरिकांना परत पाठवण्याच्या धोरणाच्या बाजूचं वाटलं असं तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले म्हणाले. तर अशा बेकायदेशीर स्थलांतराला मदत करणाऱ्या बेकायदेशीर संस्थांवर कारवाई करायचा सरकारचा विचार आहे का, असा प्रश्न माकपचे खासदार जॉन ब्रिटास यांनी विचारला.