परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची लाओस इथं भेट घेतली. यावेळी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांबद्दल चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारत-चीन सीमेवरील स्थितीचे प्रतिबिंब दोन्ही देशांच्या संबंधांत दिसून येईल.
सीमेवरील सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत दोन्ही देश सहमत असून, वास्तविक नियंत्रण रेषा आणि मागील करारांचा आदर करणं आवश्यक आहे, असंही डॉ जयशंकर यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशातील संबंध स्थिर राहणं हे परस्पर हिताचं असून, आशिया आणि बहुध्रुवीय जगासाठीही ते आवश्यक आहे. त्यामुळं दोन्ही देशांनी तात्कालिक समस्या तातडीनं सोडविण्यासाठी परस्पर संपर्क साधण्याची गरज आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलं आहे.