शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक आणि शैक्षणिक ज्ञानातून निर्माण होणारे संशोधन आणि परिसरातील विकास हे परस्पर पूरक असायला हवे, उद्योग विकासाकरिता त्या क्षेत्रातील उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये समन्वय आणि संवाद असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल केलं. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे आयोजित भारतीय उद्योग महासंघाच्या विदर्भ शाखेद्वारे आयोजित ‘ विदर्भामध्ये शैक्षणिक धोरणाला चालना ‘ या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते. उद्योगसमूहांनी स्टार्टअप परिसंस्था , कच्च्या मालाला तसंच स्थानिक मनुष्यबळाला योग्य रीतीनं चालना देणे आवश्यक असल्याचं गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. नागपूरमध्ये मदर डेअरीच्या साडे चारशे कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे तिथल्या दुग्धविकासाला चालना मिळणार असून 5 ते 7 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.