डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 24, 2024 7:15 PM

printer

दक्षिण महाराष्ट्र,कोकण,आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती

हवामान खात्यानं आज पालघर, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दक्षिण महाराष्ट्र, कोकण, आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी ओलांडेल, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राधानगरी धरण ९५ टक्के भरल्यानं स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. दूधगंगेतून पाणी सोडलं आहे. वारणा धरणातूनही ८ हजार ८७४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांचं पाणी विस्तीर्ण पसरलं आहे. तब्बल ६३ मार्गांवरची वाहतूक थांबल्यानं निम्मा जिल्हा ठप्प झाला आहे. महापुराचं पाणी रस्त्यावर आल्याने एसटीचे २० मार्ग बंद आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पूरबाधित गावातल्या नागरिकांना हलवलं आहे. पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. जिल्ह्यात एका सार्वजनिक मालमत्तेसह १४३ खाजगी मालमत्तांची पडझड झाली आहे.

 

सांगली जिल्ह्यात वारणा आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्या पात्राबाहेर पडल्यामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. महानगरपालिका क्षेत्रातल्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये नदीचं पाणी आल्यामुळ तिथल्या नागरिकांचं स्थलांतर केलं आहे. सध्या कृष्णा नदी पाणी पातळी वाढ होत असून नदीकडच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

पालघर जिल्ह्यात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्यातलं सर्वात जास्त पाणी क्षमता असलेल्या सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण ८० टक्के भरलं असून या धरणातून सध्या सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. कवडास आणि धामणी या दोन्ही धरणांमधून सूर्या नदीत २२ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या ६५ पेक्षा अधिक गावांना प्रशासनानं धोक्याचा इशारा दिला आहे. तानसा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून आज धरणाचे तीन दरवाजे उघडून ३ हजार ३१५ क्यूसेक या दरानं विसर्ग सुरू आहे.

 

रत्नागिरी जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातली जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा इथली खुनी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळं मांडवी आणि पाटणबोरी या गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.
गडचिरोली जिल्ह्यातल्या पर्लकोटा नदीला पुन्हा पूर आल्यामुळं भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.
अकोल्यातही पाऊस सुरु आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा