गुजरातमध्ये, सौराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, राज्यातील सुमारे 57 गावांना पुराचा फटका बसला आहे. देवभूमी द्वारका आणि पोरबंदर हे दोन जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले असून इथे गेल्या 36 तासांत 20 इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत.
राज्य आणि केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दहा तुकड्या पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 45 जणांची आत्तापर्यंत सुटका करण्यात आली असून सखल भागात राहणाऱ्या सुमारे 400 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पावसामुळे 9 राज्य महामार्गांसह 200 हून अधिक रस्ते बाधित झाले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं आणखी दोन दिवस सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात भागातील 9 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.