डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

समान नागरी कायद्यावर देशात व्यापक चर्चेची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त

देशातले १४० कोटी नागरिक एकजुटीने वागले तर, प्रत्येक आव्हानावर मात करत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सलग ११व्यांदा मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला, त्यानंतर ते देशाला संबोधित करत होते. विकसित भारतात सर्वसामान्यांच्या जगण्यात सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा, आणि लोकांना गरज असेल तेव्हाच सरकारने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं सातत्यानं आपलं मत मांडलं असून यावर व्यापक चर्चा होण्याची गरज आहे असं ते म्हणाले. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असल्यावर समाजात फूट पडते, म्हणून धर्मनिरपेक्ष नागरी कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधली दरी कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

देशात वारंवार निवडणुका होत राहिल्या तर, प्रत्येक विकासकामाकडे निवडणुकांच्या अनुषंगानेच पाहिलं जातं, म्हणून एक देश, एक निवडणूक संकल्पना राबवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा असं ते म्हणाले.

 

भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा प्रामाणिकपणे सुरू ठेवण्याची ग्वाही त्यांनी लाल किल्ल्यावरून दिली. निराशेच्या गर्तेत बुडालेल्या काही लोकांच्या विचारसरणीमुळे देशाचं मोठं नुकसान होत असून, त्यांच्यामुळे देशाच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याकरता अनेक वर्षे लागतात, त्यामुळे अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं असं ते म्हणाले.

 

देशातल्या परिवर्तनाचा सर्वाधिक लाभ हा इथल्या वंचित घटकांपर्यंत पोहोचला असून, देशाचा सर्वांगीण विकास हेच आपल्या सरकारच्या धोरणं आणि कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी असल्याचं त्यानी सांगितलं. आजवरच्या प्रयत्नांमुळे देशाचं दरडोई उत्पन्न दुप्पट करण्यात सरकारला यश आल्याचंही ते यावेळी म्हणाले.

 

देशातल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याची गरज पडू नये, आणि त्या कारणापोटी मध्यमवर्गीयांवर खर्चाचा बोजा पडू नये याकरता येत्या पाच वर्षांत वैद्यकीय प्रवेशाच्या ७५ हजार नव्या जागा तयार करण्याची घोषणाही त्यांनी केली.

 

आपण कोणत्याही राजकीय भावनेतून नाही तर राष्ट्र प्रथम या भावनेतूनच देशात सुधारणा घडवून आणल्या. बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा हे त्याचेच उदाहरण असून, आज भारतीय बँका जगातल्या सर्वात मजबूत बँकांपैकी एक बनल्या असल्याचं ते म्हणाले.

 

चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या अनुषंगानं देशात कौशल्यविकास घडवून आणण्याचा, आणि या माध्यमातून भारताच्या कुशल मनुष्यबळाची ताकद जागतिक रोजगाराच्या बाजापेठेत दाखवून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 

आधुनिक काळाची गरज ओळखून विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रावर भर देत आपलं सरकार संशोधनाला पाठबळ देत असल्याचं त्यांनी सांगितलं.सरकार कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काम करत असून, येत्या काळात जगाची सेंद्रीय खाद्यान्नाची मागणी पूर्ण करणारा देश म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्याचा मानसी त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा