जम्मू काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कठुआ जिल्ह्यातल्या माचेडी भागात संरक्षण दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. हेलिकॉप्टर, बॉम्बशोधक श्वान आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही मोहीम राबवली जात आहे. परकीय देशातून आलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचा अंदाज आहे. २८ एप्रिल रोजी बसंतगढ इथं ग्राम रक्षकाची हत्या करणाऱ्या गटाचाच ते भाग असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
लष्कराच्या पाच जवानांना वीरमरण आल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुःख व्यक्त केलं. या कठीण काळात संपूर्ण देश जवानांच्या कुटुंबीयांच्या मागे उभा आहे, असं ते आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले. दहशतवादविरोधी कारवाई सुरू करण्यात आली असून लष्करी जवान या प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. या हल्ल्यात जखमी झालेल्यांनी लवकर बरं होण्याची कामनाही त्यांनी व्यक्त केली.