पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन आज साजरा झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर गेल्या वर्षी याच दिवशी भारताचं चांद्रयान उतरलं होतं. या प्रीत्यर्थ देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळ क्षेत्रातल्या प्रगतीमधे केलेल्या कामगिरीचा त्यांनी गौरव केला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते इस्रोच्या रोबोटिक चॅलेंज आणि भारतीय अंतरिक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना परितोषिके प्रदान करण्यात आली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून देशवासियांना पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या योगदानाची प्रशंसा करण्याचा आहे. सरकारनं या क्षेत्राशी संबंधित दूरदृष्टीचे निर्णय घेतले आहेत आणि आगामी काळातही घेऊ असं प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.