येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तिकर विधेयक आणलं जाईल, त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आर्थिक विकासाकरता आणि महागाईच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत, असं सीतारामन यांनी सांगितलं. महागाई असो किंवा विकासाचा मुद्दा असो चलनविषयक धोरण आणि वित्तीय धोरण समन्वयाने आखलं पाहिजे, तरच जनतेला त्याचा लाभ होईल, असंही त्या म्हणाल्या. जागतिक बाजाराच्या हालचालीवरून रुपयाची किंमत ठरते, रुपयाच्या दैनंदिन मूल्याबद्दल रिझर्व्ह बँकेला चिंता नाही, असं गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले.