१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थी आणि नवोदित निर्मात्यांचे चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशीलरीत्या विषय मांडणारे आहेत, अशा शब्दांत परीक्षक मंडळानं या निर्मात्यांचं कौतुक केलं. या दोन्ही परीक्षक मंडळांनी आज मिफच्या पाचव्या दिवशी वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वा बक्षी यांच्या नेतृत्वातल्या पाच जणांच्या परीक्षक मंडळानं माहितीपट, अॅनिमेशन आणि शॉर्ट फिक्शन अशा एकंदर ७७ चित्रपटांचं परीक्षण केलं. या मंडळात अॅना हेनकेल, अॅडेल सीलमन, डॉ. बॉबी सर्मा बरुआ आणि मुंजाल श्रॉफ यांचाही समावेश होता. चित्रपटांच्या परीक्षणाचं हे काम अतिशय अवघड असल्याचं मत या सर्वांनी मांडलं.
चित्रपटांचे मुख्य विषय, उत्तम लेखन, मांडणी, पुरुषसत्ताक संस्कृतीला छेद देणारी पुरुष पात्रांची हळुवार मांडणी, अॅनिमेशनपटांमध्ये कथेचं महत्त्व कमी होऊ न देता तंत्रज्ञानाचा केलेला उत्तम वापर इत्यादी बाबी त्यांनी अधोरेखित केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांचं परीक्षण भारत बाला यांच्या नेतृत्वात केईकीओ बँग, बार्थेलेमी फोऊजी, ऑड्रियस स्टोनिस आणि मानस चौधरी या पाच जणांनी केलं. चित्रपटांची भाषा आणि भावभावनांचं प्रकटीकरण वैश्विक असतं, असं मत त्यांनी मांडलं. या चित्रपटांचं परीक्षण करताना खूप गोष्टी नव्याने शिकल्याचं त्यांनी नमूद केलं.
याशिवाय, मिफमध्ये आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतले माहितीपट, शॉर्ट फिक्शन आणि अॅनिमेशन, बेलारूस, रशिया आणि फ्रान्स या देशांचे, तसंच ऑस्करसाठी निवडले गेलेले चित्रपट दाखवण्यात येत आहेत. आशियाई महिलांचे विशेष चित्रपट, दिव्यांगजनांसाठी तयार केलेले विशेष चित्रपटही दाखवले जात आहेत. लघुपट, अॅनिमेशन, माहितीपट, वेबसीरीज आणि ओटीटी मंच या विषयांवरची चर्चासत्रं, परिसंवाद आणि मार्गदर्शन सत्रंही होत आहेत.