महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध, जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतले व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा काल गुन्हा दाखल केला असल्याचं ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितलं.
पांडे यांच्याखेरीज, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, तसंच इतरांमध्ये श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांचा समावेश आहे. खोट्या तक्रारी नोंदवण्याच्या धमक्या देणं, पैसे उकळणं, खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणं इत्यादी आरोप त्यांच्यावर आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.