भगवद्गगीतेतून विश्वाचं ज्ञान दिलेल्या श्रीकृष्णाचा जन्मसोहळा म्हणजेच गोकुळाष्टमी आज देशभरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी होत आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळीच्या मंदिरात आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज मध्यरात्री हा सोहळा रंगणार आहे. मथुरेसह देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मथुरेबरोबरच वृंदावन इथल्या जन्माष्टमी सोहळ्यालाही विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रातल्या विविध मंदिरांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्रीकृष्णाची मुर्ती पाळण्यात बसवून हा सोहळा साजरा करण्याची प्रथा असून उद्या मुंबईसह विविध ठिकाणी गोविंदा पथके गल्लोगल्ली उभारलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी बाहेर पडतील. जन्माष्टमी निमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.