राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांना आदरांजली वाहत आहे. महात्मा गांधी यांची आज १५५ वी जयंती असून त्यानिमित्त देशासह परदेशातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या १२०व्या जयंतीनिमित्त विजयघाट इथल्या समाधीवर आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंती निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
सर्व नागरिकांनी सत्य, अहिंसा, प्रेम आणि सचोटी ही मूल्यं आत्मसात करून महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात साकारण्याचा तसंच देश आणि समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संकल्प करूया, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे.
सत्य, सद्भावना आणि समानता या मूल्यांचा अंगिकार करणाऱ्या महात्मा गांधींच्या आदर्शांमुळे देशाला कायम प्रेरणा मिळत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं असून लाल बहादूर शास्त्री यांनी आपलं आयुष्य शेतकरी, सैनिक आणि देशाभिमानासाठी समर्पित केलं, असं म्हटलं आहे.
गांधी जयंतीनिमित्त देशोदेशीच्या भारतीय दूतावासांमध्ये महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. रियाध मधल्या भारतीय दूतावासानं स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत गेले १५ दिवस राबवलेल्या ‘स्वच्छता ही सेवा अभियानाचा’ समारोप आज झाला. यामध्ये स्वच्छताविषयक अनेक उपक्रम राबवले गेले. एक पेड माँ के नाम या उपक्रमात रियाध मध्ये पंधराशे रोपं लावण्यात आली.