भारत आणि आसियान देश यांच्यातलं सहकार्याचं धोरण अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मात करून आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावता येईल, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी आज सिंगापूर इथं केलं. ते आज आठव्या आसियान इंडिया नेटवर्क ऑफ थिंक-टँक्सच्या गोलमेज परिषदेला संबोधित करत होते.
जयशंकर यांनी भारत आणि आसियान देशांमधले समकालीन प्रश्न, राजकीय गुंतागुंत, डिजिटल आणि उर्जा विकास, अशा विविध मुद्द्यांवर भाषण केलं. या दौऱ्यात जयशंकर सिंगापूरचे राष्ट्रपती आणि प्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करणार आहेत. भारत आणि सिंगापूर दरम्यान १९९० पासून अत्यंत मजबूत द्विपक्षीय संबंध असून, भारताला आग्नेय आशियाई देशांशी जोडण्यात सिंगापूरची महत्वपूर्ण भूमिका आहे.