परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले. या भेटीत ते रियाध इथं होत असलेल्या पहिल्या भारत-आखात सहकार्य संघटनेच्या – जीसीसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पश्चिम आशियातले ६ देश या संघटनेचे सदस्य आहेत. याशिवाय या दोन दिवसांच्या भेटीत ते जीसीसीच्या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत द्विपक्षीय बैठका घेण्याचीही शक्यता आहे.
येत्या मंगळवारी ते आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात दोन दिवसांच्या जर्मनी भेटीसाठी रवाना होतील. जर्मनीचा दौरा आटोपून १२ सप्टेंबरला ते स्वित्झर्लंड भेटीसाठी रवाना होतील. स्वित्झर्लंडमध्ये ते जीनिव्हा इथं स्वित्झर्लंडचे परराष्ट्र मंत्री तसंच, भारताचा सक्रीय सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.