भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अब्दुल खलिल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संबंध अतिशय महत्वाचे असल्याचं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं. भारत हा नेहमीच संकटकाळी मदत करणारा पहिला देश असून भारतानं मालदीवला कठीण प्रसंगी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल खालिल यांनी आभार मानले. भारताच्या सहकार्यानं मालदीवमध्ये समुदाय विकास प्रकल्प सुरु करण्यासाठीच्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली.