पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदार परिषदेच्या राजकीय, सुरक्षा, सामाजिक आणि सांस्कृतिक समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते नवी दिल्ली इथं बोलत होते. यावेळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद हे उपस्थित होते. पश्चिम आशिया विशेषतः गाझापट्टीत निर्दोष नागरिकांच्या मृत्यूबद्दल जयशंकर यांनी यावेळी दुःख व्यक्त केलं. पॅलेस्टाईनच्या संघर्षावर द्विराष्ट्र संकल्पनेच्या तोडग्याचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. दोन्ही देशांचे संबंध प्रगतीचं उद्दिष्टावर आधारित आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन्ही देशात परस्पर दृढ सहकार्य असल्याचं जयशंकर म्हणाले.
सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान अल सौद म्हणाले की भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातले संबंध हे परस्पर आदर आणि सहकार्याच्या भक्कम पायावर उभे आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा आणि आर्थिक विकास या समान मुद्यांवर सौदी अरेबिया भारतासोबत उभा असेल असंही ते म्हणाले.