महाराष्ट्रतल्या नवनिर्वाचित सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज सायंकाळी चार वाजता नागपूर इथं राजभवनात होणार आहे. उद्यापासून राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही वेळापूर्वीच नागपुरात दाखल झाले आहेत. राजभवनात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून ज्येष्ठ आमदार चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गरीश महाजन, आशिष शेलार यांच्यासह मराठवाड्यातील पंकजा मुंडे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर आदी १९ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, अनिल पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक यांच्यासह ९ जणांचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. तसंच शिवसेना पक्षाकडून आमदार उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट यांच्यासह १२ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.
विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा संविधानानं निर्माण केलेल्या संस्थांवर विश्वास नसल्याची टीका केली. दरम्यान, सायंकाळी मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी होणार असून, त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषद घेणार आहेत.