जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर रविवारच्या बाजारात झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात किमान १० नागरिक जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार टीआरसी क्रॉसिंग भागात दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या वाहनांच्या दिशेनं एक ग्रेनेड फेकला, मात्र त्यांचा नेम चुकल्यानं तो रस्त्यावर फुटला. पोलिसांनी या भागात नाकेबंदी करून आरोपींना शोधण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस महासंचालक नलीन प्रभात आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या हल्ल्याबाबत चर्चा केली आणि यामागे ज्यांचा हात आहे, त्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्यावं, अशी सूचना त्यांना दिली. तसंच या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.
Site Admin | November 3, 2024 6:36 PM | aakashvani | jammu&kashmir