पूर्व भारतातल्या विस्तारित रेल्वे जाळ्यामुळं संपूर्ण प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. झारखंड राज्याची राजधानी रांची इथं ते काल बोलत होते. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून काल साडेसहाशे कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचं भूमीपूजन तसंच लोकार्पण करण्यात आलं. याचवेळी प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ माध्यमातून सहा नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
प्रधानमंत्री जमशेदपूरमधल्या टाटानगर इथून या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र वाईट हवामानामुळे प्रधानमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उड्डाण न करु शकल्यानं त्यांनी रांचीमधून दूरस्थ पद्धतीनं या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. भारतातल्या विस्तारीत रेल्वेजाळ्यामुळे व्यवसाय, उद्योग, व्यावसायिक तसंच विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं सांगताना वंदे भारत रेल्वेगाड्यांमुळे तरुणांसाठी नवे रोजगार उभे राहात असल्याचं मोदी यांनी सांगितलं.