साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा म्हणजेच विजयादशमीच्या सणाचा आज राज्यभरात उत्साह आहे. गेले नऊ दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या सांगतेचा आजचा दिवस. यानिमित्त राज्यभरातल्या देवीच्या मंदिरांमधून सीमोल्लंघनाच्या मिरवणूका काढल्या जाणार आहेत. देवीचं शक्तीपीठ असलेल्या कोल्हापुरातला शाही दसरा सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज संध्याकाळी देवी अंबाबाईची पालखी निघणार असून दसरा चौकात छत्रपती घराण्यातील मान्यवरांकडून शमी पूजन केलं जाईल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहोळा आज सकाळी सात वाजून 40 मिनिटांनी नागपूरमधल्या रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राज्यात इतरत्रही आज संघातर्फे पथसंचलन आणि शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.
आज धम्मचक्र प्रवर्तन दिनही साजरा होत आहे. या निमित्त नागपूरमधल्या दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी मुख्य कार्यक्रम होणार असून उत्तरप्रदेशमधल्या कुशीनगर भिक्षु संघाचे अध्यक्ष भदंत ए.ए.बी. ज्ञानेश्वर, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते आकाश लामा आणि दीक्षाभूमीवरील बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. राज्यातले तसंच देश-परदेशातले लाखो अनुयायी या सोहोळ्यात सहभागी होण्यासाठी नागपुरात आले आहेत. प्रशासनानं यासाठी सर्व सोई सुविधांची चोख व्यवस्था ठेवली आहे. दरम्यान काल दीक्षाभूमीवर भदंत ससाई यांच्या नेतृत्वात पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.