गेल्या १० वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये ३६ टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. २०१४ ते २०२४ या काळात देशात १७ कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला, तर गेल्या वर्षभरात ६० लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आहे. गेल्या १० वर्षांमध्ये कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींमध्ये १९ टक्के, उत्पादन क्षेत्रात १५ टक्के आणि सेवा क्षेत्रात ३६ टक्के वाढ झाल्याचं या आकडेवारीमधून स्पष्ट होत असल्याचं यात म्हटलं आहे.
देशातला बेरोजगारीचा दर २०१७-१८ मध्ये ६ टक्के होता. २०२३-२४ मध्ये तो कमी होऊन सुमारे सव्वा ३ टक्क्यांवर आला. तर रोजगाराचा दर २०१७-१८ मधल्या सुमारे ४७ टक्क्यांवरून २०२३-२४ मध्ये ५८ टक्क्यांच्या पलीकडे गेल्याचं यात म्हटलं आहे.
पदवीधर तरुणांची रोजगारक्षमता २०१३ मधल्या सुमारे ३४ टक्क्यांवरून २०२४ मध्ये सुमारे ५५ टक्क्यांपर्यंत गेली. १८ ते २८ वर्ष वयोगटातल्या ४ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त तरुणांनी ईपीएफओ, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत आपली नोंदणी केल्याचं मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.