यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. यासंदर्भात नुकतीच दिल्लीत बैठक झाली. कॉंग्रेस अध्यक्ष मल्ल्लीकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी आपण स्वतः चर्चा केली आहे. देशभरात या संदर्भात काँग्रेस जनआंदोलन करणार आहे. राज्यात दोन दिवसानंतर सह्यांची मोहीम सुरु केली जाईल. कोट्यावधी नागरिकांच्या सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश आणि निवडणूक आयोगाला देणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं.
यावेळी राज्यात स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार बनले नाही या घटनेचा त्यांनी निषेध केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावर, महाविकास आघाडी मतदान यंत्रावर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान करत असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आपली मतं कमी का झाली, यावर त्यांनी चिंतन करावं, असं ते म्हणाले.