चुकीची माहिती आणि सायबर सुरक्षा धोका यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या धोरणात सकारात्मक बदल करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक व्यवस्थापन संस्थांना केलं. भारतीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. कार्यक्षमता, पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मतदारांचा विश्वसा जिंकण्यासाठी तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची आहे, असं सांगत निवडणूक प्रक्रियेबाबत संशय उत्पन्न करणाऱ्या कथनांबाबत सावधगिरी बाळगायला हवी, असं राजीव कुमार म्हणाले. निवडणूक प्रक्रियेत भविष्यात महत्वाच्या ठरू पाहणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कार्यप्रणाली, ऑनलाईन आणि दूरस्थ मतदान याचाही त्यांनी उहापोह केला.
जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे.