महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेसने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांचा विचार केला जाईल असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहीलं होतं. त्यावर अंतरिम उत्तर देताना आयोगाने म्हटलंय की मतदार याद्यांचं परिरक्षण करताना सर्व राजकीय पक्षांचा सहभाग होता. मतदानाच्या टक्केवारीत काहीही विसंगती नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं असून संबंधित माहिती मतदान केंद्रांच्या तपशिलासह सर्व उमेदवारांना उपलब्ध होती. आणि ती पडताळून पाहणंही शक्य होतं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यातली तफावत केवळ डेटा गोळा करण्यात लागलेल्या विलंबामुळे असून त्या दृष्टीनं आयोगाने रात्री पावणेबारा वाजता खुलासेवार प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. याखेरीज कायद्याच्या चौकटीत उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा करायची असल्यास काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने येत्या मंगळवारी ३ डिसेंबरला यावं असं आयोगाने सांगितलं आहे.
Site Admin | November 30, 2024 8:22 PM | Election Commission of India