बांगलादेशातल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशातल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयानं तिथे अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
यासाठी बांगलादेशात असलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली असून, तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, तसंच केंद्रीय अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनानं एक पथक स्थापन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बांगलादेशातल्या भारतीय दूतावासाशी समन्वय साधला जात आहे.
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून, या आव्हानात्मक काळात राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांबरोबर असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.