महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
गेल्या अडीच वर्षात राज्याच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन महाराष्ट्र समृद्ध करण्याचं आहे. त्यासाठी आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही, असा शब्द त्यांनी सर्व महिलांना दिला.
यावेळी त्यांनी राज्याच्या आणि विदर्भाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. सध्या राज्यात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असं आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.