मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) आठव्या ‘लोकशाही दिनाचं’ आयोजन दिनांक १३ जानेवारीला २०२५ ला म्हाडा मुख्यालयात दुपारी १२:०० वाजता करण्यात येणार आहे. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी-अडचणी यांची न्याय आणि शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासन स्तरावर राबविण्यात येत असतो. त्याच धर्तीवर जानेवारी २०२४ पासून ‘म्हाडा’मध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत सात म्हाडा लोकशाही दिन झाले असून म्हाडाशी निगडीत सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या या माध्यमातून सोडविण्यात आल्या आहेत. नागरिकांना तात्काळ निर्णय देणं सुलभ व्हावं यासाठी विषयाशी निगडित संबंधित विभाग-मंडळ प्रमुख देखील हजर राहत असल्यानं न्याय प्रक्रिया अधिक सुलभ आणि तत्परतेनं राबविण्यात येते म्हणूनच म्हाडा लोकशाही दिनाला सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समस्येचं तात्काळ निराकरण होत असल्यानं लोकशाही दिनात सहभागी अर्जदारांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
म्हाडा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणं आवश्यक असून त्याचं प्रपत्र १ अ ते प्रपत्र ड हे नमुने म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अर्जदाराची तक्रार-निवेदन वैयक्तिक स्वरूपाचं असावं, तसंच अर्जदारानं अर्ज विहित नमुन्यात १४ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणं आवश्यक आहे. तसंच म्हाडा लोकशाही दिनातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोच पावतीही दिली जात आहे.