ईद उल फित्र अर्थात रमजान ईद हा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त आज ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमधे सामूहिक नमाज अदा करण्यात आली. मुस्लीम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू देत ईदचा आनंद साजरा करत आहेत.
राज्यात मुंबईसह सर्वत्र ईद साजरी केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठण करण्यात आलं. वाशिममधे ईदगाह मैदानावर भाविकांनी नमाज अदा करत जगात शांतता नांदावी, अशी प्रार्थना केली. त्यानंतर गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अकोल्यामधे हरिहर पेठेतल्या मैदानावर भाविकांनी नमाज अदा केली. अरबी भाषेतले खुत्बा पठण सैय्यद फैजानुद्दीन यांनी केलं तर काजीमुद्दीन खातिब यांनी सामूहिक दुवा केली. हिंगोलीतही भाविकांनी ईदची नमाज अदा केली. सोलापूरमधे ईद उत्साहात साजरी झाली. मुफ्ती सय्यद अमजद यांनी ईदगाह मैदानावर जमलेल्या भाविकांना एकतेचा संदेश दिला. नांदेडमधे देगलूर नाका इथल्या मैदानावर भाविकांनी नमाज अदा केली. धुळे शहरातही ईदचा उत्साह दिसून आला.