डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बकरी ईद सण देशभरात उत्साहात साजरा

ईद उल अजहा हा सण देशभरात उत्साहाने साजरा होत आहे.  देशाच्या विविध भागात आज ईदगाह तसंच मशिदीत नमाज अदा करुन एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

नागपूर मध्यवर्ती कारागृहातल्या प्रार्थना भवनात जामिया अरेबीय इस्लामीया या संस्थेनं बकरी ईद निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. बकरी ईदचा नमाज अदा करुन बंदीवानांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

लातूर शहरातल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज झाली त्यानंतर भारतासह जगभरात शांतता नांदावी म्हणून प्रार्थना झाली. निलंगा इथल्या ईदगाह मैदानावरही सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

 

वाशिममध्ये केकत उमरा रोडवरच्या ईदगाह मैदानावर तसंच इतर मशिदींमध्ये नमाज अदा करुन ईद साजरी केली. 

 

 

नाशिक आणि मालेगाव इथंही ईदगाह मैदानावर मुख्य नमाज झाली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन ईद साजरी केली. 

 

जालना शहरात कदीम ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर पारंपारिक पद्धतीनं ईद साजरी झाली. 

 

 

सोलापूरमध्ये सर्व ईदगाह मैदानांवर सामुहिक नमाज आदा करण्यात आली. सोलापूरचे काझी सय्यद मुफ्ती महमदअली यांनी एकात्मता, शिक्षण, संस्कार आणि पुण्यकर्माचा संदेश दिला. 

 

अहमदनगरमध्ये ईदगाह मैदान इथं सकाळी धार्मिक व्याख्यान, खुदबा आणि त्यानंतर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. नमाजनंतर शहरातील कब्रस्तानं आणि दर्ग्यांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

 

दिल्लीत जामा मशिद, फतेहपुरी मशिद आणि शाही इदगाहमध्ये  नमाज अदा करण्यात आली.  

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  भारतीयांना ‘इद उल अजहा’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईद उल अजहा हा त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस आहे आणि आनंद वाटून घेण्याचा संदेश त्यातून मिळतो, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या सणाच्या माध्यमातून  एकात्मता, करुणा आणि सार्वभौमत्व या मुल्यांची जपणूक करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी  केलं आहे. ईद-उल अजहा या खास दिवसाच्या निमित्ताने समाजात एकोपा आणि सुसंवाद वाढीला लागावा, अशा सद्भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केल्या आहेत. 

 

बांगलादेशातही उत्साहाने आणि धार्मिकतेने इद साजरी होत आहे. इदनिमित्त एकत्रित नमाज अदा करण्यात येत आहे.  बांगलादेशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन तसंच प्रधानमंत्री शेख हसीना यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा