सर्व शैक्षणिक संस्थांनी मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पुण्यात केलं. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या २१व्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. ज्ञानामध्ये जगात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकांच्या गरजा समजून घेऊन विकासात योगदान द्यावं, स्वतःच्या पुढे जाऊन समाजाचा विचार करावा असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. दीक्षांत समारंभात 11 सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी 8 मुली होत्या याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लैंगिक समानतेवर भर देऊन सर्वसमावेशक विकासासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मंत्री चंद्रकांत पाटील आणि विद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजुमदार उपस्थित होते. या विद्यापीठात शिकत असलेल्या 85 देशांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना आपल्या देशांचे ध्वज सादर केले.
राष्ट्रपती आज लातूर आणि नांदेड जिल्ह्याला भेट देणार असून उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तसंच संध्याकाळी नांदेडच्या तख्त श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा इथं त्या दर्शन घेणार आहेत.