देशाचा वास्तविक जीडीपी वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२४-२५ या वर्षातल्या आर्थिक पाहणीचा अहवाल संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे सादर केला. कृषी आणि सेवा क्षेत्राच्या पाठबळावर देशाची अर्थव्यवस्था सातत्यपूर्ण प्रगती करत असून खरिपात चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भागातल्या मागणीत वाढ होत आहे. कारखाना क्षेत्राला मात्र देशाबाहेरुन मागणी घसरल्याचा फटका बसला आहे. वैयक्तिक उपभोगाचं प्रमाण स्थिर राहिलं, आर्थिक शिस्त आणि सेवा पुरवठ्यात वाढ या मजबूत बाबींमुळे स्थूल रुपाने आर्थिक स्थैर्य मिळालं असं अहवालात नमूद केलं आहे. २०११- १२मधे स्थिर केलेल्या निकषांवर आधारित चलनफुगवट्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६ पूर्णांक ७ दशांश टक्के तर पूर्ण वर्षभरात ५ पूर्णांक ४ दशांश टक्के वाढ झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात जीडीपी वाढीचा दर ६ टक्के राहिला असं अहवालात म्हटलं आहे.
देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचं योगदान पाऊण ते एक टक्क्याने वाढणार असून कृषी क्षेत्रच आर्थिक वाढीसाठी आश्वासक असल्याचं मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही अनंत नागेश्वरन यांनी म्हटलं आहे.