ईस्टर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आज सर्वत्र भक्तीभावात साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टरनिमित्त ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या अनेक चर्चेस मधे आज प्रार्थना आणि प्रवचनाचे कार्यक्रम होत आहेत.
हा सण नवीन आशा आणि नव्या प्रारंभाची प्रेरणा देतो असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभसंदेशात म्हटलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तांची मानवता, करुणा आणि सेवा यांची अजरामर शिकवण सौहार्दपूर्ण सामाजिक जीवनासाठी मार्गदर्शक असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य़ांनी ईस्टरनिमित्त दिलेल्या शुभेच्छांमधे सर्वांना आनंद आणि सलोख्याची कामना केली आहे.
राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राज्यातल्या जनतेला ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही इस्टर सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना आनंदयमी ईस्टरच्या शुभेच्छा असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या आनंदाच्या दिवशी प्रत्येकाचं हृदय प्रेम आणि आनंदानं भारून जावं, आणि प्रत्येकाला अनेकानेक आशीर्वाद मिळावेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेल्या युद्धादरम्यान ईस्टर निमित्त ३० तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हा युद्धविराम ३० दिवसांपर्यंत वाढवावा अशी मागणी केली आहे.