परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आपल्या सहा दिवसांच्या ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दौऱ्यासाठी आज ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथं पोहोचले. या भेटीदरम्यान ते ब्रिस्बेनमधे ऑस्ट्रेलियामधल्या भारताच्या चौथ्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील. कॅनबेरा इथं ते ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत परराष्ट्रमंत्र्यांच्या १५ व्या फ्रेमवर्क संवाद परिषदेचं संयुक्त अध्यक्षपदही भूषवणार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संसद भवनात होणाऱ्या दुसऱ्या रायसिना डाउन अंडरच्या उद्घाटन सत्रात ते बीजभाषण देणार आहेत. या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियन नेते, संसद सदस्य, ऑस्ट्रेलियात स्थायिक भारतीय लोक, व्यापारी समुदाय, माध्यमं आणि थिंक टँक यांच्याशीही संवाद साधणार आहेत.
या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, डॉ. जयशंकर या महिन्याच्या ८ तारखेला अधिकृत भेटीसाठी सिंगापूरला जाणार आहेत, या भेटीत ते आसियान अर्थात इंडिया नेटवर्क ऑफ थिंक टँकच्या ८व्या गोलमेज परिषदेला संबोधित करतील. उभय देशांमधल्या घनिष्ठ भागीदारीचा आढावा घेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं ते सिंगापूरच्या नेत्यांचीही भेट घेतील.