डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण तसंच 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन राज्यभरात उत्साहात साजरा

देशभरात काल दसरा म्हणजेच विजयादशमीचा सण पारंपरिक हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किला मैदानावर दसरा सोहोळ्यात भाग घेतला. वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक म्हणून रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं यावेळी दहन करण्यात आलं. श्री धार्मिक लीला समितीनं आयोजित केलेल्या या दसरा कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दार्जिलिंग मध्ये लष्कराच्या जवानांबरोबर शस्त्रपूजा करून विजयादशमी साजरी केली. शास्त्र आणि शस्त्राला समान दर्जा देणारा भारत हा एकमेव देश असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.समृद्ध, समर्थ, विकसित महाराष्ट्र घडवायचा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी काल मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलं. आझाद मैदान इथं आयोजित या मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्य सरकारनं आजवर केलेल्या कामगिरीला उजाळा दिला.तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मराठी माणसाच्या एकजुटीची शपथ दिली आणि शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी मशाल धगधगत ठेवण्याचं आवाहन केलं. मुंबईत शिवाजी पार्क इथं आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. राज्य शासनानं सुरु केलेल्या लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याठी प्रयत्न करुया, असं आवाहन पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी सोहोळयासाठी मुख्य अतिथि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. सर्व सण आणि उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असं भागवत यावेळी म्हणाले.

 

बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी चिंता व्यक्त केली आणि हिंदूंना एकजूट होण्याचं आवाहन केलं. आपल्या देशाची परंपरा आणि आपली संस्कृतीचा दाखला देऊन कोलकातासारख्या घटना परत घडू नयेत यासाठी आपण सर्वानी सावध राहायला हवं असं प्रतिपादन त्यांनी केलं. काही ओटीटी मंचांवर पसरलेली असभ्यता सांस्कृतिक मूल्यांच्या ऱ्हासास कारणीभूत आहे आणि कायदेशीर व्यवस्थेद्वारे ती नियंत्रित करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट मत भागवत यांनी व्यक्त केलं. पुण्यातील वानवडी इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे विजयादशमीनिमित्त संचलन करण्यात आलं. यवतमाळच्या कळंब तालुक्यातील सुकळी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दसऱ्यानिमित्त, दसऱ्याचं सोनं, व्यसनमुक्तिचं लेणं हा अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी शाळेत आपट्याच्या पानावर व्यसनमुक्तीचे संदेश लिहून ते मोठ्यांचे आशीर्वाद घेताना द्यायचे ठरविले. सलाम फाउंडेशन आणि शिक्षण विभागाकडून हा उपक्रम राबविण्यात आला. धुळे शहर आणि जिल्ह्यात विजया दशमीचा सण पारंपारीक पध्दतीनं उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात 5 ठिकाणी भव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बीड मधील पाटोदा तालुक्यातील सावरगांव इथं भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी पारंपरिक दसरा मेळाव्यात भाग घेतला. पुन्हा सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं.  कृषीमंत्री धनंजय मुंडे याप्रसंगी उपस्थित होते.

नागपूर इथं 68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहोळा दीक्षाभूमी इथं पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई या सोहोळ्याचे अध्यक्ष होते तर मुख्य अतिथी म्हणून पश्चिम बंगालच्या अखिल भारतीय बौद्ध मंचाचे राष्ट्रीय महासचिव आकाश लामा उपस्थित होते. देशभरातून मोठ्या संख्येने धम्मवचन ऐकण्यासाठी अनुयायी जमा झाले होते. वाशीम इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बौद्ध बांधवांनी बौद्ध वंदना घेतली आणि पंचशील धारण केलं आणि  22 प्रतिज्ञांचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाला वाशिम शहरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नांदेड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सकाळी हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये ‘महा बुद्धवंदने’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा