आझाद मैदानावर आज भरलेला शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद शिवसेनेचा आझाद मेळावा असून दोन वर्षांच्या मोजक्या कालावधीत आपलं सरकार लाडकं सरकार झालं असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना दिली. खऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होऊ लागला, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्ही उठाव केला. तो केला नसता तर महाराष्ट्र अनेक वर्षं मागे गेला असता, अशी टीका त्यांनी केली.
आगामी निवडणुकीत आमचं सरकार निवडून येईल आणि त्यानंतर महायुती सरकारचे सगळे घोटाळे बाहेर काढून आम्ही दोषींवर कारवाई करू, असं प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दादरच्या शिवाजी पार्कवर भरलेल्या दसऱ्या मेळाव्याला त्यांनी यंदा पहिल्यांदाच संबोधित केलं. आगामी निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची लूट आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठीची लढाई आहे, असं प्रतिपादनही त्यांनी केलं.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात भगवान भक्तीगड इथं कार्यकर्त्यांच्या दसरा मेळाव्याला संबोधित केलं. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाचा शिक्का विधानसभा निवडणुकीत पुसून टाकायचा असून त्याकरता आपण राज्यव्यापी दौरा करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बीड जिल्ह्यात शिरूर – कासार तालुक्यात नारायणगड इथं कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.