डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जोरदार पावसामुळे पाणीपातळी वाढल्यानं अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं दिलासा दिल्यानं जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्यामुळं पुणे शहरात निर्माण झालेली पूरस्थिती आता नियंत्रणात आली आहे. या भागांमध्ये कालपासून प्रशासन आणि एनडीआरएफच्या मदतीसाठी आवश्यक बचाव उपकरणांसह लष्करी मदत तैनात करण्यात आली आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

 

नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गिरणा नदीपात्रात आज मासेमारीसाठी गेलेल्या १५ मच्छिमारांची विशेष हेलीकॉफ्टरनं सुटका केली आहे. हे मच्छिमार रविवारी मुठा नदीमध्ये मासे पकडण्यासाठी गेले असताना गंगापुर धरणातून पाणी सोडल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सध्या गंगापूर धरणातून ८ हजार १००, दारणा धरणातून २२ हजार ३८३ तर नांदूरमध्यमेश्वर इथून ५४ हजार २३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

 

धुळे जिल्ह्यातल्या अक्कलपाडा धरणातून काल सायंकाळ पासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर आला आहे. महानगरपालिकेनं आतापर्यंत योग्य त्या उपाययोजना केल्या असून स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातले उजनी धरण आणि वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरु असलेल्या पावसामूळे धरणे शंभर टक्के भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून संध्याकाळी १ लाख २५ हजार क्युसेक, तर वीर धरणातून ३३ हजार ६०९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

 

पंढरपूर तालूक्यातले पिराची कुरोली, गुरसाळे, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, पूळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधल्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा