डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर चर्चा सुरु

संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल मांडण्यात आलेल्या आभारप्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. भाजपा खासदार अनुराग सिंह ठाकुर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या लोककल्याणकारी योजनांचं आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाचा उल्लेख केला. भाजपा सरकारच्या काळात २५ कोटी लोकसंख्या गरिबीतून वर आली, तसंच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं गेलं असं ते म्हणाले.

 

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारवर त्यांनी टीका केली. तत्पूर्वी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘नीट’ परीक्षेतल्या कथित गैरप्रकारावर दिवसभराच्या चर्चेची मागणी केली. त्यावर आभारप्रस्तावावर चर्चा सुरू असताना इतर कोणत्याही विषयावर चर्चा केली जात नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं. आभारप्रस्तावरल्या चर्चेनंतर नीट परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल, असं आश्वासन सभापतींनी द्यावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली. मात्र, सभापतींनी ती नाकारल्यानं विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

 

राज्यसभेतही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला सुरुवात झाली. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरल्या चर्चेत सहभाग घेतला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात राज्यघटना आणि लोकशाही समोरच्या आव्हानांचा तसंच दुर्बल घटकांच्या प्रश्नांचा उल्लेख असेल अशी अपेक्षा होती. परंतु आपली निराशा झाल्याचं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. या अभिभाषणात गरीब, दलित आणि अल्पसंख्यकांसाठी काहीही नसल्याचं खर्गे म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा