कमी अंतरावर लक्ष्य़भेद करण्यासाठीच्या ४ क्षेपणास्त्रांची चाचणी काल राजस्थानात पोखरण इथं यशस्वी झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये ही चाचणी पार पडली. या चाचणीमधून या क्षेपणास्त्रांची विविध प्रकारे मारा करण्याची क्षमता सिद्ध झाल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. ही क्षेपणास्त्रं डीआरडीओच्या प्रयोगशाळेत तयार केलेली स्वदेशी संरक्षण प्रणाली आहे, असंही संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
क्षेपणास्त्रांची चाचणी यशस्वी केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, लष्कर आणि या चाचणीत सहभागी असणाऱ्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे. या क्षेपणास्त्रांमुळे सशस्त्र दलांची तांत्रिक बाजू भक्कम होईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. डीआरडीओचे प्रमुख समीर कामत यांनीही क्षेपणास्त्रांच्या चाचणीबद्दल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.