प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना आज त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली वाहिली. डॉ. मुखर्जी यांनी देशाला अभिमान वाटेल असं कार्य केलं. त्यांनी मातृभूमीसाठी केलेला त्याग आणि बलिदान यांमुळे देशवासियांना प्रेरणा मिळाली आहे, असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
तर अमित शहा समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले की, डॉ. मुखर्जी यांनी देशाची एकता आणि अखंडतेसाठी दिलेला लढा दिला. जनसंघाच्या स्थापनेतून देशाला आदर्शवादाची आणि राष्ट्र प्रथम या विचारांची देणगी दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देखील डॉ. मुखर्जी यांच्या पक्ष मुख्यालयातल्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्र प्रथम या तत्वाचं पालन करत डॉ. मुखर्जी देशाच्या समृद्धी आणि सार्वभौमत्वासाठी आयुष्यभर झटले. काश्मीर असो किंवा बंगाल, देशाची अखंडता कायम राहावी यासाठी त्यांनी केलेलं बलिदान देश कधीही विसरणार नाही, असं नड्डा समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.