ज्येष्ठ लेखिका, प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
डॉ. प्रभू यांनी सुमारे २० वर्षं लंडनमध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम केलं. त्यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला आणि या प्रवासांदरम्यान आलेले अनुभव प्रवासवर्णनांद्वारे त्यांनी वाचकांसमोर मांडले. ‘माझं लंडन’ हे त्यांचं पहिलं प्रवासवर्णनात्मक पुस्तक होतं.
त्यानंतर ‘इजिप्तायन’, ‘तुर्कनामा’, ‘दक्षिणरंग’, ‘गाथा इराणी’, ‘चिनी माती’ अशी त्यांची प्रवासवर्णनं गाजली. दि. बा. मोकाशी पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कारांनी डॉ. मीना प्रभू यांना सन्मानित केलं होतं. गेल्या वर्षी साहित्यक्षेत्रातल्या योगदानासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता.