डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

 

नागपूर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दल मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या दीक्षाभूमीतल्या यात्री निवासात  महारक्तदान शिबिराचं  आयोजन करण्यात आलं होतं. 

 

हिंगोली जिल्ह्यातही  विविध ठिकाणी अभिवादन सभा तसंच कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वाशिम शहरातल्या  विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज पहाटे कॅण्डल रॅली काढण्यात आल्या होत्या. धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता मंचाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराची सुरुवात स्वच्छता कर्मचारी महिलेच्या हस्ते करण्यात आली होती. 

 

बुलडाणा जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.  बुलडाणा शहरातल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक अनुयायांनी पुष्पहार अर्पण केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. 

 

धुळे शहरात ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय अभियानांतर्गत महा रक्तदान शिबिर आयोजित  करण्यात आलं होतं. या  शिबिराला रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.  

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकरांना आज रत्नागिरीतही ठिक-ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. त्यासाठी रत्नागिरी शहरातल्या पुतळ्याजवळ मध्यरात्रीपासूनच अनुयायी मोठ्या संख्येनं दाखल झाले होते. भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या तुकडीनंही डॉ. आंबेडकरांना  मानवंदना दिली. सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या  वही,  पेन आणि शैक्षणिक साहित्य अभियानादरम्यान  वह्या-पेनं तसंच  शैक्षणिक साहित्य अर्पण करून असंख्य अनुयायांनी डॉ. आंबेडकरांना  वैचारिक अभिवादन केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा