देशातील प्रसारणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेलं दूरदर्शन आज आपली ६५ गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. १५ सप्टेंबर १९५९ रोजी स्थापन झालेल्या दूरदर्शनने भारताच्या प्रसारण युगाची सुरुवात केली. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्या दिवशी दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाचं उद्घाटन केलं होतं. १९७५ पर्यंत दूरदर्शन आकाशवाणीचाच घटक होता. १ एप्रिल १९७६ रोजी, त्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका स्वतंत्र विभागात रूपांतर झालं आणि ते प्रसार भारती अंतर्गत आलं. सरकारचं स्वायत्त सार्वजनिक सेवा प्रसारक असलेलं दूरदर्शन प्रसार भारतीच्या दोन विभागांपैकी एक आहे. आज, दूरदर्शन आपल्या स्टुडिओ आणि ट्रान्समीटरच्या विशाल जाळ्यासह देशातली सर्वात मोठी प्रसारण संस्था आहे. दूरचित्रवाणी, ऑनलाइन आणि मोबाइल सेवेबरोबरच दूरदर्शन – महानगर, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, ३५ उपग्रह वाहिनी चालवणाऱ्या नेटवर्कमध्ये दूरदर्शनचा विस्तार झाला असून यात २४ तास चालणार्या ६ डीडी राष्ट्रीय वाहिन्या आणि २२ प्रादेशिक वाहिन्या आहेत. याबरोबरच ५९ ट्रान्समीटरसह डीडी, सहा प्रादेशिक आणि एक आंतरराष्ट्रीय वाहिनी चालवत असते. या व्यतिरिक्त दूरदर्शनच्या दिल्लीतल्या तोडापूर अर्थ स्टेशनवरून डीडी फ्री डिश – ही DD DTH सेवा उपलब्ध आहे. कृष्णधवल दूरचित्रवाणीच्या काळापासून ते डिजिटल आणि सॅटेलाइट प्रसारणाच्या सध्याच्या युगापर्यंत, दूरदर्शनने आपल्या विविध स्तरांमधील प्रेक्षकांची बदलती अभिरुची आणि प्राधान्यक्रम पूर्ण करण्यासाठी स्वतःचा सातत्त्याने विकास केला आहे.
Site Admin | September 15, 2024 8:16 PM | 65 years | Doordarshan